‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम ३ डिसेंबरला

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम ३ डिसेंबरला 
Share

पुणे – वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम यंदा ३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक एक तास पुस्तक वाचनाचा आनंद घेणार आहेत. अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १२ ते २० डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांचे उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.

यंदाही नागरिक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमींना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालये, धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, विद्यापीठे, बसस्थानके, रेल्वेस्थानके आणि मेट्रो स्थानकांसह विविध ठिकाणी एकाच वेळी वाचन केले जाणार आहे. उपक्रमासंदर्भातील अधिक माहिती फर्ग्युसन महाविद्यालयातील पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयातून मिळू शकेल.

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम यंदा सर्व संस्था, सोसायट्या आणि संघटनांमध्ये राबवण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे पुण्यात वाचन संस्कृती रुजत असल्याचे दिसून येते. संपूर्ण शहराने काही क्षण थांबून पुस्तक वाचणे, हीच या उपक्रमाची मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सकाळी ११ ते १२ या वेळेत आवडीचे पुस्तक वाचावे असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.

Vedh News