घरासमोर उभी केलेली पीकअप गाडी किराणा मालासहित चोरीला, उरळीकांचन मधील घटना

घरासमोर उभी केलेली पीकअप गाडी किराणा मालासहित चोरीला, उरळीकांचन मधील घटना
Share

घराजवळ उभी केलेली महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी त्यामध्ये असलेल्या किराणा मालासहित अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. ही घटना कांचन पार्क, उरळीकांचन येथे शनिवार रात्री (दि. ७) ते रविवार (दि.९) सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. पिकअप आणि किराणा माल असा एकूण साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

या प्रकरणी संदीप श्रीमंत गवळी (वय २४ रा. कांचन पार्क, उरळीकांचन, मूळ रा. हिंगणी ता. बार्शी ) यांनी उरळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गवळी हे आठवडे बाजारात किराणा दुकान लावून व्यवसाय करतात. शनिवारी सकाळी त्यांनी विजय ट्रेडर्स मधून किराणा माल खरेदी करून पिकअपमध्ये भरला. त्यानंतर गोसावी वस्ती येथे गाडी उभी केली. रात्री ८ वाजता ते पिकअप घेऊन आपल्या कांचनपार्क येथील घराजवळ आले. तेथील अंतर्गत रस्त्याला गाडी उभी करून लॉक करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांना लोणगाव येथील आठवडे बाजार येथे जायचे असल्याने ते गाडी घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी पिकअप गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला पण गाडी न सापडल्यामुळे त्यांनी उरळीकांचन पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Vedh News