पीएमपीएमएलकडून ५ नवे बस डेपो उभारणार; नव्याने दाखल होणाऱ्या अडीच हजार बससाठी नियोजन

पीएमपीएमएलकडून ५ नवे बस डेपो उभारणार; नव्याने दाखल होणाऱ्या अडीच हजार बससाठी नियोजन
Share

पुणे – पीएमपीएमएल प्रशासन पुण्यात पाच नवीन आगारांची निर्मिती करणार असून, सध्याच्या पाच आगारांचा विकास व विस्तार करण्यात येणार असून पीएमपीच्या ताफ्यात लवकरच अडीच हजार नवीन बस दाखल होणार असून त्यांना सामावून घेण्यासाठी ‘पीएमपी’ने नव्या जागेसाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. नव्या बस पार्किंगसाठी चार्जिंग व्यवस्था व देखभाल दुरुस्तीची सुविधा उभी करण्यावर भर दिला जाणार आहे.

पीएमपीसाठी आरक्षित असलेली जागा पीएमपीच्या ताब्यात मिळवण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांची पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासमवेत नुकतीच बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्तांनी पीएमपीसाठी आरक्षित असलेल्या जागा पीएमपीला हस्तांतरित करणार असल्याचे सांगितले. याशिवाय आगारांचा विकास करण्यास सहमती दर्शवली आहे.

यात सुतारवाडी, कोथरूड (एकलव्य महाविद्यालयाच्या मागे), कोंढवा, मोहम्मदवाडी आणि बिबवेवाडीत आगार बांधले जाणार आहेत. बालेवाडी, शेवाळवाडी, मार्केटयार्ड, कोथरूड आणि कुंबरे पार्क या पाच डेपोचा विस्तार केला जाणार आहे. पाचही ठिकाणी केबलिंग आणि काँक्रिटीकरणाची कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या कुंबरे पार्क येथे बस पार्किंग आणि चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नव्या डेपोमुळे शहरातील विस्तारलेल्या भागांवर बस सेवा पोहोचवणे सुलभ होणार आहे.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या २ हजार ७२ बस आहेत. त्यापैकी एक हजार ७६० बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असतात. मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात सुमारे १,००० बस दाखल करण्याचे नियोजन आहे. एकूण २,५०० बसपैकी १२ इलेक्ट्रिक आणि १ हजार सीएनजी बस असणार आहेत. याशिवाय स्वारगेट आणि शेवाळवाडी येथे २ अतिरिक्त सीएनजी स्टेशन उभारण्याचा विचार सुरू आहे.

Vedh News