पीएमपीएमएल तर्फे पर्यटन बस सेवा, पिंपरी-चिंचवडमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देता येणार

पीएमपीएमएल तर्फे पर्यटन बस सेवा, पिंपरी-चिंचवडमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देता येणार
Share

पिंपरी- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) तर्फे पर्यटन बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बसमधून नागरिकांना पिंपरी चिंचवड आणि परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे.

दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही सेवा उपलब्ध असून, वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मधून पर्यटकांना रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर, देहूतील गाथा मंदिर, भंडारा डोंगर, याशिवाय भोसरीमार्गे चाकण, राजगुरुनगर, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ आणि गजानन महाराज मठ अशा ठिकाणांनाही भेट देता येणार आहे.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि माहितीपूर्ण व्हावा, यासाठी प्रत्येक पर्यटन बसमध्ये मार्गदर्शक सेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांची माहिती तसेच मार्गदर्शन या सेवकांकडून केले जाणार आहे. प्रति प्रवासी केवळ ५०० रुपये तिकीटदर असून बसच्या आसनक्षमतेनुसार ३३ प्रवाशांचा संपूर्ण गट आरक्षित केल्यास पाच प्रवाशांच्या तिकीटदराइतकी १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

एखाद्या दिवशी प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद मिळाल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे बससेवा रद्द झाल्यास प्रवाशांना पुढील आठवड्यातील शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवास करता येणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये सहकुटुंब पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

Vedh News