आळंदीमध्ये मध्यरात्री चार मजली गोडाऊनला भीषण आग ; ज्येष्ठ महिलेचा होरपळून मृत्यू
आळंदी- आळंदीत शिवतेज चौक परिसरातील ‘विकास क्लॉथ सेंटर’ या चार मजली गोडाऊनला सोमवारी (दि.९) रात्री साडेसातच्या सुमारास भीषण आग लागून ७५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामक दलाने इमारतीमध्ये अडकलेल्या अन्य रहिवाशांची जीवाची बाजी लावून सुखरूप सुटका केली.
शकुंतला इंद्र्कुमार धाडीवाल (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे. सरला सुमतीलाल लोढा या अन्य एका ज्येष्ठ महिलेला सुखरूप वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सोमवारी रात्री ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी. कपड्याचे गोडाऊन असल्यामुळे थोड्याच वेळात आगीने भीषण स्वरूप प्राप्त केले. गोडाऊनमध्ये कपडे आणि मोठ्या प्रमाणावर पुठ्ठ्यासारखा ज्वलनशील साठा असल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता पाहून पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.
अग्निशमन दल, पोलीस महावितरणचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशांत कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे यांनी बचावकार्य सुरु केले. मात्र दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या शकुंतला इंद्र्कुमार धाडीवाल यांना वाचवण्यात यश आले नाही. अरुंद गल्ल्या, दोन्ही बाजूंच्या अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी आल्या.
