बारामती मार्केटयार्ड परिसरात औषधी इंजेक्शनच्या संशयित बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

बारामती मार्केटयार्ड परिसरात औषधी इंजेक्शनच्या संशयित बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश
Share

बारामती- औषधी इंजेक्शनच्या संशयित बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश करण्याची मोठी कामगिरी बारामती शहर पोलिसांनी केली आहे. बारामती शहर पोलिसांनी दिवाळीच्या दिवशी इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी अचानक छापा टाकून प्रतिबंधित आणि संशयित औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात काही व्यक्ती विनापरवाना आणि अनधिकृतपणे या विशिष्ट औषधी इंजेक्शनची विक्री करण्यासाठी साठा बाळगून असल्याची गुप्त माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. यात ‘मेफेन्टरमाइन सल्फेट’ या प्रतिबंधित इंजेक्शनच्या साधारण ११० बाटल्यांचा समावेश आहे. आरोपींकडे या औषधांची विक्री किंवा साठा करण्यासाठी कोणतेही वैध बिल, परवाना (License) किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील दोन मोटारसायकल आणि औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ऐन सणाच्या दिवशी ही मोठी कारवाई केल्यामुळे अवैध औषध पुरवठा करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हा साठा कुठून आणला गेला होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पुढील तपासात यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

‘मेफेन्टरमाइन सल्फेट’ इंजेक्शन म्हणजे काय ?

हे औषध मूळतः वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी किंवा शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वापरले जाते। मात्र, गेल्या काही काळापासून तरुण आणि जिममध्ये जाणारे युवक शरीर क्षमता किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि नशेसाठी याचा बेकायदेशीरपणे वापर करत असल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय या इंजेक्शनचा वापर केल्यास हृदयाचे ठोके मंदावणे, झटके येणे, मानसिक भास होणे आणि इतर गंभीर आजार उद्भवण्याचा मोठा धोका असतो.

Vedh News