पारंपरिक काव्यप्रकारांनी नवयुग दिवाळीसांज २०२६ उत्साहात संपन्न

पिंपरी- टाळ – मृदंग अन् तालवाद्याची संगीतसाथ लाभलेल्या स्वरचित पारंपरिक काव्यप्रकारांच्या श्रवणीय मैफलीने नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ तसेच स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था आयोजित ‘दिवाळीसांज २०२६’ उत्तरोत्तर रंगतदार झाली.
राम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पागळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव यांचे अभ्यासपूर्ण निवेदन असलेल्या या मैफलीचा प्रारंभ सुभाष चव्हाण यांनी केलेल्या मंगलमय शंखवादनाने करण्यात आला. त्यानंतर माधुरी विधाटे (शारदास्तवन), प्रा. तुकाराम पाटील (पाळणा), आय. के. शेख (जोगवा), राजेंद्र पगारे (अभंग), उमा इनामदार (भक्तिगीत), वंदना इन्नाणी (गवळण), राजेंद्र घावटे (भक्तिगीत), सविता इंगळे (लोकगीत), अनिकेत गुहे (गीत), अश्विनी कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, माधुरी ओक (भारूड), संपत शिंदे (अभंग), सुरेश कंक (योगगीत), पुरुषोत्तम हिंगणकर (भक्तिरचना), रेणुका हजारे (भक्तिगीत), चंद्रकांत धस (गवळण), जितेंद्र राय (नज्म) अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकारांच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
मैफलीचा समारोप शाहीर आसराम कसबे यांच्या ‘मायमराठीची शिकवण’ या लोकगीताच्या दमदार सादरीकरणाने करण्यात आला. याप्रसंगी स्व. दत्तोपंत म्हसकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, पी. बी. शिंदे, प्रकाश ननावरे, नेहा कुलकर्णी, यांच्यासह पिंपरी – चिंचवड शहरातील साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. त्यापैकी किसनमहाराज चौधरी आणि कविवर्य अनिल दीक्षित यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून नंदकुमार मुरडे यांनी नवयुग आणि किरण कुलकर्णी यांनी दत्तोपंत म्हसकर या संस्थांच्या कार्याची माहिती दिली. सुभाष पागळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून साहित्यिकांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे लेखन करावे, असे आवाहन केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद वाडकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदान आणि सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






