‘दीपसंध्या’च्या सुरेल मैफिलीने दिवाळीची पूर्वसंध्या उजळली

‘दीपसंध्या’च्या सुरेल मैफिलीने दिवाळीची पूर्वसंध्या उजळली
Share

पुणे – दिवाळीच्या पूर्वसंध्येला रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड आणि साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दीपसंध्या’ हा संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टेरेसवर हा कार्यक्रम पार पडला.

संगीत विशारद डॉ. अनघा काळे राजवाडे आणि त्यांच्या टीमने या कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते, लोकगीते तसेच जुन्या हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांची सुरेल मैफल सादर केली. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल आणि येसुदास यांच्या अजरामर गीतांनी उपस्थितांना जुन्या आठवणींमध्ये रमविले. विशेषतः महाराष्ट्र भूषण दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधील ठेका धरायला लावणाऱ्या अवीट गोडीच्या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

डॉ. अनघा काळे राजवाडे, संजय मरळ, आणि स्वाती मोडक यांनी आपल्या सादरीकरणातून मैफिलीला रंगत आणली.

या कार्यक्रमाला लायन्स प्रांत ३२३४ डी-२ चे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन मुरलीधर साठे, वेध न्यूजचे संचालक अनिल कातळे, डॉ विलास साबळे, बांधकाम व्यावसायिक अरुण इंगळे, मुकुंद आवटे, सुदाम भोरे, डॉ अनु गायकवाड डॉ शंकर गायकवाड डॉ रोहिदास आल्हाट उद्योजक संदीप वाळुंज, परशुराम बोरहाडे, शंकर देवरे आणि प्रशांत शर्मा उपस्थित होते.

लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष लायन डॉ. सौम्या साबळे, सेक्रेटरी जयश्री साठे, खजिनदार राजकुमार बिरादार आणि साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक सुरेखा साबळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहभाग घेतला. प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची माहिती दिली.

रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित केला जात आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

संगीत, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संगम असलेली ‘दीपसंध्या’ची ही मैफिल उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरली.

Vedh News