घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्वारगेट बसस्थानक परिसरातून अटक; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्वारगेट बसस्थानक परिसरातून अटक; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
Share

पुणे- घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने स्वारगेट बसस्थानक परिसरातून अटक केली.

रोहित दीपक सातपुते (वय २१, रा. घोरपडे पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि संतोष टकले यांना रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानक परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सातपुते हा पर्वती पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी होता. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, तो पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक तेजस्वी पवार, शंकर नेवसे व पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

Vedh News