नो गिफ्ट! पिंपरी-चिंचवड पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास बंदी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारण्यास बंदी घालणारे परिपत्रक जारी केले आहे.
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी (भेटवस्तू) स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये. तसेच, या कलमातील टिप-२ नुसार शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याचे टाळावे, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
नवीन परिपत्रकानुसार, नियम मोडणाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलेला असला तरीही या निर्णयाचे पालन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कसे केले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण यापूर्वीही अनेक आयुक्तांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध नियम केले, परंतु ते केवळ कागदावरच राहिले.






