अधिकारी-ठेकेदार-बिल्डरांच्या संगनमताने शहराचे नुकसान; नगरसेवक शीतल शिंदे यांचा हल्लाबोल

पिंपरी- महापालिकेतील अधिकारी, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांच्या कथित संगनमतामुळे शहराचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक शीतल शिंदे यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामे, भूखंड व्यवहार, रुग्णालयातील अनियमितता, बीआरटी व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.
गरवारे कंपनीच्या भूखंडावरील ‘आय टू आर’ प्रकल्पात महापालिकेला मिळणारा मुख्य रस्त्याकडील अमेनिटी भूखंड न देता कमी मूल्याचा मागील बाजूचा भूखंड दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
चिंचवडमधील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मंजूर नकाशापेक्षा ३३६ चौ.मी.हून अधिक अतिरिक्त क्षेत्र वापरून अनधिकृत मजला उभारल्याचा आरोपही त्यांनी केला. या बांधकामाचे तांत्रिक ऑडिट करून संबंधित बिल्डर व आर्किटेक्टवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या मजल्याच्या विक्रीतून सुमारे २.५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना धर्मादाय योजनेंतर्गत मोफत किंवा सवलतीच्या खाटा नाकारल्या जात असल्याचा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकवून त्यांचे शोषण होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. जुन्या इमारतीवर स्ट्रक्चरल ऑडिटविना बांधकाम सुरू असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. विनापरवाना कॅन्टीन व पार्किंगच्या समस्येवरही कारवाईची मागणी केली.
बीआरटी मार्गांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अपघात, पाच ते सहा दिवस कचरा न उचलणे, स्मार्ट रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि नदीपात्र बुजवून जमिनी हडपण्याचे प्रकार यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. महापालिकेच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांबाबत नगरसेवक आणि नागरिकांना विश्वासात घेतले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. नवीन आयुक्तांच्या कार्यकाळात १२ अधिकारी लाच घेताना पकडले जाऊन निलंबित झाल्याचा दावा करत शिंदे यांनी प्रशासनाच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.






