पुण्यात तरुणाची गोळी झाडून आत्महत्या, ‘आता ही शेवटची भेट….आत्महत्येपूर्वी मित्रांना केला मेसेज

पुण्यात तरुणाची गोळी झाडून आत्महत्या, ‘आता ही शेवटची भेट….आत्महत्येपूर्वी मित्रांना केला मेसेज
Share

पुणे – पुण्यातील खराडी परिसरात लग्न होत नाही आणि प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याच्या नैराश्यातून २६ वर्षीय तरुणाने कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना खराडीमधील तुळजाभवानी नगरमधील हॉटेल गौरव रेसिडेन्सीमध्ये गुरुवारी (दि. २९ ) रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली.

अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मीरा लक्ष्मण चव्हाण यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे हा कोरेगाव भीमा येथील स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होता. तो २७ ऑक्टोबर रोजी खराडी येथील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथील तिसर्‍या मजल्यावरील खोलीमध्ये मुक्कामाला होता. २९ ऑक्टोंबर रोजी दुपारपर्यंत त्याने खोली न उघडल्याने त्यांनी खोली उघडून पाहिले तर अक्षय कांबळे याच्या हातात पिस्तूल होते व तो खाली पडलेला होता. रिसेप्शनिस्ट जितेंद्र पाडी याने खराडी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अक्षय कांबळे याने दोन्ही हाताने पिस्तूल पकडलेले व उजव्या हाताचा अंगठा पिस्तुलाच्या एक्स्ट्रॅक्टरवर अडकलेला दिसून आला. त्याचे वडील व भाऊ विशाल कालिदास कांबळे यांनी अक्षय कांबळे याला ओळखले. त्याने कपाळावर मधोमध गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

अक्षय कांबळे याचा विवाह होत नव्हता. तसेच प्रेम करत असलेल्या तरुणीने दुसर्‍याबरोबर लग्न केल्याच्या निराशेतून आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्याने ‘आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी’ असा मेसेज मित्रांना केल्याचे आढळून आले आहे. अक्षय कांबळे याच्याकडे हे विनापरवाना पिस्तूल कोठून आले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.

Vedh News