चाकण – अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणार्या ट्रकचा तब्बल सहा तास पाठलाग करून चाकणमध्ये ट्रक अडवून तब्बल १ कोटी १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांसह एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणात चालक नफीस मेहबूब खान (वय ४०, हरियाणा), पुरवठादार निलेश राठी (खामगाव, बुलढाणा), अरुण पाटील (जळगाव), वाहतूकदार संजय माटा (इंदूर, मध्य प्रदेश) यांच्यासह वाहन मालक जे.एम.डी एंटरप्रायजेस (धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणार्या ट्रकबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली. हा ट्रक मध्यप्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, ट्रक चालकाने अचानक मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी आपला मार्ग बदलला. मार्ग बदलताच ठाणे आणि पुणे विभागाची पथके त्याचा मागावर होती. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने रवाना झाले, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोलनाक्यावर एफडीएचे सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक आडवा लावून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता भरधाव पुढे नेला.सावळे यांनी वाहनाचा पाठलाग सुरू ठेवला. तसेच एफडीए प्रशासनाच्या पथकाने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत पाठलाग सुरूच ठेवला.
चाकण-तळेगाव चौकात पोलिसांच्या मदतीने ट्रक पकडण्यात आला. सहा तासांच्या या थरारक पाठलागानंतर रात्री आठच्या सुमारास ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकची झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा प्रतिबंधित साठा आढळला.
