ब्रेकिंग न्यूज

मातोश्री परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा ; आदित्य ठाकरे यांच्या वकिलाने स्वीकारली अब्रू नुकसानीची नोटीस 

Share

मुंबई- उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर आज चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन हिच्या वडिलांनी तब्बल 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. आज ही नोटीस देण्यासाठी दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन हे आपल्या वकिलांसह मातोश्री बंगल्याबाहेर आले. त्यांनी मातोश्रीच्या गेटवर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना नोटीस दिली. यावेळी परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या प्रकरणी आरोप केले होते. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सतीश सालियन यांच्याकडून सातत्याने केली जात आहे.

सतीश सालियन हे आपल्या वकिलांसह नोटीस बजावण्यासाठी येणार असल्याची पूर्वकल्पना मिळताच मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचे पाऊल उचलत कलानगरचे मुख्य गेट बंद केले. या घडामोडींमुळे मातोश्रीबाहेर जवळपास २५ ते ३० मिनिटे प्रचंड तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सतीश सालियन यांच्या वकिलांनी मातोश्रीच्या गेटवर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना अब्रुनुकसानीची नोटीस दिली.

आदित्य ठाकरे यांनी नुकतेच या प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडली होती. आपण दिशाला ओळखतही नसून तिच्यासोबत आपली कधीच भेट झाली नाही. चारित्र्यहनन करण्याच्या हेतून अशाप्रकारचे आरोप आपल्यावर केले जात असल्याचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील या आरोपांचे खंडन केले होते.