बारामती – भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या मुख्य चौकात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमोल सदाशिव जाधव असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणात ऋतिक आणि ओंकार या दोघा संशयितांची नावे समोर आली आहेत. घटनेनंतर ते दोघे पसार झाले असून दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके बारामती तालुक्यातील विविध भागांत रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जाधव यांना काऱ्हाटीच्या मुख्य चौकात गाठण्यात आले. त्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह हातावर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण काय, पूर्वीचा वाद कशातून झाला होता आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. गावच्या मुख्य चौकात भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे काऱ्हाटी परिसरात खळबळ उडाली आहे.
