बोपखेल – गणपतीची वर्गणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणाने महिलेला शिवीगाळ व धमकी देत लाकडी बांबूने मारहाण केली. ही घटना बोपखेल येथील रामनगर परिसरात घडली. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
ही घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगर, बोपखेल येथील गणपती मंदिराजवळील गिरणीत घडली. याप्रकरणी आशा महेंद्र यादव (वय ४२, रा. रामनगर, बोपखेल) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गिरणीत काम करीत असताना आरोपी बादल वाल्मिकी (वय १८, रा. रामनगर, बोपखेल) तेथे आला. त्याने फिर्यादीकडे गणपती वर्गणीची मागणी केली. मात्र, यादव यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी चिडला आणि त्याने फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच हातातील लाकडी बांबूने फिर्यादीला मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या कानाला दुखापत झाली. घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
