ब्रेकिंग न्यूज

पतीच्या चारित्र्यावर पत्नीचा संशय, मध्यरात्री तिघांनी पतीला उचलले आणि लोखंडी हातोडीने केले वार

Vector illustration in HD very easy to make edits.
Share

पिंपरी- आपल्या पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान पतीला बेदम मारहाण करण्यात झाली. ही घटना पिंपरीच्या बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसहित एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या पतीच्या ३० वर्षीय बहिणीने फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आकाश अनिल खंडागळे (वय ३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्यासह ५० आणि २८ वर्षीय दोन महिलांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या भावाच्या चारित्र्यावर त्याची पत्नी सतत संशय घेत होती. ज्यावरून त्यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. वादाचा राग मनात धरून मंगळवारी पहाटे संशयित आरोपींनी संबंधित पतीला गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात लोखंडी हातोडीने थेट त्याच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि बरगड्यांवर सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.