तळेगाव दाभाडे – मावळच्या राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारे माजी मंत्री मदन बाफना यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळसह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मदन बाफना हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांनी मावळच्या राजकारणात सक्रिय योगदान देत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मावळच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली.
१९६७ मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७७ ला ते जिल्हा परिषद सदस्य झाले. मावळ विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार आणि राज्य सरकारमध्ये दोन वेळा राज्यमंत्री होते. १९८५ मध्ये मावळमधून आमदार म्हणून प्रथम निवडून आले. १९८९ मध्ये राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे महसूल आणि नगरविकास खात्याची जबाबदारी होती.
मदन बाफना हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि निष्ठावंत सहकारी मानले जात होते. राजकीय व्यासपीठांवर शरद पवार यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेत असत.
मदन बाफना यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि. १५ रोजी संध्याकाळी ४ वाजता वडगाव मावळ येथील राहत्या घरापासून निघणार असून वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी वडगाव मावळ येथील हरकचंद रायचंद बाफना डी एड कॉलेज येथे सकाळी १० वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
