ब्रेकिंग न्यूज

आंबेगाव तालुक्यात दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Share

मंचर – आंबेगाव तालुक्यात मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. ११) दुपारी झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर- मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथे इको मोटारीचा अपघात झाला, तर नारायणगाव-जाधववाडी अष्टविनायक महामार्गावर मोटारसायकलला स्विफ्ट मोटारीने धडक दिल्याने दुसरा अपघात झाला.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळील मोरडेवाडी येथे आनंदराव शंकर कोळेकर (वय ५३, रा. करंजविहिरे, ता. खेड) व किरण बाबुराव डुंबरे (वय ३५, रा. दावडी, ता. खेड) हे इको मोटारीतून (एमएच १४ एचडब्ल्यू ४३२७) आळेफाटा येथे उपचार घेत असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडून सुमारे २० फूट खाली कोसळली. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. गंभीर दुखापत झाल्याने कोळेकर व डुंबरे यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरा अपघात नारायणगाव-जाधववाडी अष्टविनायक महामार्गावर जाधववाडी गावाजवळ झाला. रमेश भाऊ जाधव (वय ५६) व तुषार सुरेश जाधव (वय ३१, दोघेही रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) हे नारायणगाव येथे गवार विकून परत येत असताना मागून आलेल्या स्विफ्ट मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात रमेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तुषार जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लक्ष्मण उंडे ,पोलीस रमेश उगले यांनी दोन्ही ठिकाणी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.