ब्रेकिंग न्यूज

गजानन मारणे टोळीचा मोक्कातील फरार आरोपी ससूनमध्ये उपचारासाठी आला असताना ताब्यात

Share

पुणे – पुणे शहरातील कुख्यात गजानन मारणे टोळीचा एक फरार आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडला आहे. हा आरोपी मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार होता आणि त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरु होता. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक काम करत होते. यावेळी पोलीस अंमलदार अतुल साठे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी श्रीकांत उर्फ बब्या संभाजी पवार (वय ३९ रा. वडगाव मावळ) हा सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.

या माहितीवरून पोलीस पथकाने ससून गाठले. ससूनच्या गेट नंबर ६ जवळ सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

या आरोपीवर यापूर्वी खंडणी आणि गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अत्रे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.