ब्रेकिंग न्यूज

पुण्यात ‘एफडीए’ची धडक कारवाई ; चार ट्रक खवा आणि पनीर जप्त 

Share

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ट्रक जप्त करण्यात आले. 

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात FDA च्या पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पनीर आणि खव्याचा साठा ताब्यात घेतला. मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. या कारवाईमुळे खाद्य व्यवसायिकात खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, मोदक तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी खवा आणि पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या कालावधीत भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

दरम्यान, सण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाटल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटपाबाबतही FDA ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा कार्यक्रमांची पूर्वसूचना किमान सात दिवस आधी देण्याची सूचना करण्यात आली आहे.