ब्रेकिंग न्यूज

पुण्यात बिबवेवाडी येथे भोंदू महिलेने बांधकाम ठेकेदाराला ४५ हजाराला गंडवले 

Share

पुणे – पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ नावाच्या एका भोंदू महिलेने सोलापूर जिल्ह्यातील एका बांधकाम ठेकेदाराला कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून ४५ हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिला मोनाली विधाते हिने सोशल मीडियावर कौटुंबिक समस्या आणि अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनेक चित्रफिती (व्हिडीओ) प्रसारित केल्या होत्या. हे व्हिडीओ पाहून पीडित बांधकाम ठेकेदार तिच्या संपर्कात आले

महिलेने सुरुवातीला ठेकेदाराला हळदी-कुंकू, बाहुली आणि दोर पाठवले. त्यानंतर त्यांना बिबवेवाडीतील सुखसागरनगर येथील घरी बोलावून मृत्यूची भीती दाखवली व ‘पीडा’ दूर करण्यासाठी ‘उतारा’ टाकण्याच्या बहाण्याने वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन माध्यमातून ४५ हजार रुपये उकळले

पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी तक्रारदाराला मारहाण करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदाराने पोलिसात धाव घेतली

पोलिसांची कारवाई:या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी मुख्य आरोपी मोनाली विधाते, तिचा भाऊ मयूर, कृष्णा विधाते, अशोक बनकर आणि मंजू कौर अशा ५ जणांवर फसवणूक, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या भोंदू टोळीने आणखीही अनेकांना फसविल्याचा पोलिसांना संशय असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत