ब्रेकिंग न्यूज

बटन दाबताच नंबरप्लेट गायब ; इ चलन वाचवण्यासाठी फॉर्च्युनर मालकाचा जुगाड अखेर उघडकीस

Share

पिंपरी- स्पीड कॅमेरा आणि ऑनलाइन ई-चलानची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी कारला रिमोट संचालित ‘मोटराइज्ड’ यंत्रणा बसवणाऱ्या फॉर्च्युनर कार चालकाला आपण केलेला जुगाड महागात गेला आहे. या कार मालकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय भगवान वाघमारे (रा. ताथवडे) असे या कार मालकाचे नाव असून या मालकाने आत्तापर्यंत ५५ पेक्षा जास्त ई-चलान द्वारे तब्बल १ लाख २२ हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती अशी की संबंधित कार चालकाने कारच्या डॅशबोर्डवर एक ‘सिक्रेट पुश बटन’ बसवले होते. हे बटन दाबताच नंबर प्लेटवर एक काळा पडदा खाली यायचा, ज्यामुळे धावत्या गाडीचा नंबर पूर्णपणे झाकला जात असे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर हाय स्पीडमध्ये धावताना नंबर प्लेट गायब करण्याचा हा प्रकार पाठीमागून येणाऱ्या एका वाहनचालकाने कॅमेऱ्यात कैद केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आरटीओ आणि वाकड पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा शोध घेतला. त्यानंतर बेकायदेशीर फेरबदल केल्याप्रकरणी ४,५०० रुपयांचा दंड आकारला आणि ती यंत्रणा जप्त केली. मात्र, शासनाची फसवणूक करणे, स्वतःचे अस्तित्व लपवणे आणि अपघातासारख्या गंभीर गुन्ह्यावेळी शासकीय यंत्रणेला चकवा देण्याचा स्पष्ट हेतू दिसल्याने अखेर वाकड वाहतूक विभागाचे पोलीस काँस्टेबल रोहिदास बोऱ्हाडे यांच्या तक्रारीवरून कार मालक विजय वाघमारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.