पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना आणि नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या रूफ टॉप (गच्चीवरील) हॉटेल्सवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. हॉटेलचालकांकडून सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या हॉटेल्सचे सर्वेक्षण हाती घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, निगडी, प्राधिकरण, स्पाइन रोड आणि भोसरी परिसरामध्ये अशा हॉटेल्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी इमारतींच्या गच्चीवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हॉटेल्स चालवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात शहरातील विविध भागात ४९ ठिकाणी रूफ टॉप हॉटेल्स असल्याचे आढळून आले होते.
यापैकी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हॉटेल्सवर कारवाई केली तर काही हॉटेल्सना कायदेशीर नोटीस बजावून विविध परवानग्या घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरच्या दोन अडीच वर्षांच्या काळात शहरात पुन्हा नव्याने गच्चीवरील हॉटेल्सची संख्या वाढली आहे. रुफटॉप हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा, बांधकामविषयक नियम आणि आवश्यक परवानग्यांचे पालन केले जात नसल्याचे महापालिकेकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सर्वेक्षण सुरु केले आहे. अनधिकृत बांधकाम किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
