पुणे- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ( महामेट्रो ) नागरिकांसाठी तीन वर्षांपूर्वी प्रीपेड ’पुणे कार्ड’ उपलब्ध करून दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी काढलेल्या कार्डची मुदत आता संपली आहे, तर काहींची मुदत संपत आली आहे. प्रवाशांनी जवळच्या मेट्रो स्थानकावर जुने कार्ड जमा करून नवे कार्ड घेऊन जावे तसेच जुन्या कार्डवरील शिल्लक संपूर्ण रक्कम नवीन कार्डमध्ये क्रेडिट केली जाईल असे महामेट्रोकडून जाहीर करण्यात आले आहे.
मेट्रोच्या ‘पुणे कार्ड’ची मुदत संपल्यानंतर त्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम वापरता येत नसल्याने प्रवाशांना पुन्हा तिकीट काढावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने ही अडचण तातडीने दूर करून मुदत संपण्यापूर्वीच प्रवाशांना नवीन कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली. त्यावर मेट्रो प्रशासनाने पुढील आठवड्यापासून मुदत संपलेली कार्डे जवळच्या मेट्रोस्थानकावर जमा करून त्या बदल्यात नवीन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक सुजित कानडे यांनी सांगितले.
