पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माेशी कचरा डेपाेत मोठी दुर्घटना घडून ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील ४० दिवसांत दहाही क्षेत्रीय कार्यालयात कचऱ्यासाठी जागा निश्चित न झाल्यास माेशीत कचरा टाकल्यास डेपाेला टाळे ठाेकण्यात येईल, असा इशारा माेशी परिसरातील नगरसेवकांनी दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या विषयपत्रिकेवर माेशी दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या विषयावर नगरसेवक बाेलत हाेते. माेशी दुर्घटनेनंतर शहरातील कचऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. माेशी दुर्घटनेला दाेन महिने हाेत आले तरी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. प्रशासन कचऱ्याच्या प्रश्नावर गंभीर आहे की नाही, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.
नगरसेवक निखिल बोऱ्हाडे म्हणाले, ‘मोशी दुर्घटनेला दोन महिने पूर्ण होत आले, तरी शहरात इतरत्र कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा निश्चित केेलेल्या नाहीत. नगरसेवक जागा सूचवत असून, प्रशासन काय करत आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील चिमणी बंद असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. तातडीने जागा निश्चित कराव्यात. ४० दिवसांत शहरात १० ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा निश्चित न केल्यास माेशीत कचरा टाकू दिला जाणार नाही. या भागातील आम्ही सर्व नगरसेवक डेपाेला टाळे ठाेकू.’ या चर्चेत राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, संजय काटे, माउली जगताप, सुलभा उबाळे, निता पाडाळे यांनी सहभाग घेतला.
