ब्रेकिंग न्यूज

विद्यानंद बापट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, निवृत्त पुणेकर प्राध्यापक पोलिसात तक्रार देणार

Share

पुणे- गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात आवाज उठवणाऱ्या पुण्यातील विद्यानंद बापट हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बापट हे सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मागणीला पुणेकरांनी देखील समर्थन दिले आहे. परंतु कोथरूड येथे राहणारे निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आणि सदाशिव पेठेत राहणाऱ्या शशांक महाजन यांनी बापट यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.धनंजय कुलकर्णी विद्यानंद बापट यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार आहेत.

डीजे आणि ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा अशी मागणी विद्यानंद बापट यांनी उचलून धरली आहे. त्याला पुणेकरांनी देखील साथ दिली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन दाखवून द्यावं, असे म्हटले. तसेच, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी देखील पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे वाजवू नये, ध्वनीप्रदुषण करू नये, लेझरचा वापर टाळावा, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, अशा शब्दात इशारा दिला आहे.

मात्र बापट यांचे पुण्यातील गणेशोत्सवाला विरोध करण्याचे षडयंत्र असून समाजात धार्मिक भावना दुखावणे, दंगली घडवण्यासाठी जनतेला प्रेरित करणे अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे. बापट हा एक अराजकवादी मानसिकतेचा नक्षली आहे, असा आरोप कुलकर्णी यांनी केला. शशांक महाजन म्हणाले, ” बापट डी.जे.बाबत बोलत होते तिथपर्यंत ठीक होते पण त्यांनी गणेशोत्सव साजरा करू नका, केला तर एखाद्या मैदानात मांडव टाकून साजरा करा, रस्त्यावर मांडव टाकून रहदारीला अडथळा करू नका, ढोल ताशा वाजवायचा असेल तर बंदिस्त हॉलमध्ये वाजवा असे मुद्दे बापट यांनी मांडले आहेत ते सर्वथा चुकीचे असून पुण्याच्या गणेशोत्सवाबाबत त्यांनी बोलू नये, आम्ही सुद्धा सदाशिव पेठेत राहायला आहोत, आम्हाला सुद्धा आवाजाचा त्रास होतो पण त्यांनी मुद्दा सोडून इतर गोष्टींवर बोलू नये “असे मत महाजन यांनी व्यक्त केले.