पिंपरी – महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नगरसेवकांनी केलेल्या गोंधळात पार पडली. नियमित सर्वसाधारण सभेची सात दिवसांची पूर्ण नोटीस देण्यात आली नाही, तहकूब सभेतील विषय नियमित सभेत घेता येतात की नाही, याची महापालिका अधिनियमात स्पष्टता नसतानाही विषय कसे घेतले, असा सवाल करुन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत सभात्याग केला.
आज बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. सभा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगरसेवक हातात निषेधाचे बॅनर घेऊन सभागृहात उपस्थित होते.‘नियमित सभा घेण्यासाठी सात दिवसांची पूर्ण नोटीस देणे बंधनकारक आहे. नोटीस दिल्यानंतर पाचव्या दिवशी सभा कशी घेतली जात आहे ? तहकूब सभेतील विषय तहकूब सभेतच मंजूर करणे महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक असताना ऑगस्ट महिन्याच्या तहकूब सभेतील ३१ पैकी निवडक १८ विषय सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत कोणत्या नियमाद्वारे घेतले ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला.
योगेश बहल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा विभागाचे उपायुक्त राजेश आगळे म्हणाले की सात दिवसांची पूर्ण नोटीस दिली पाहिजे. परंतु, स्थायी समितीच्या सदस्यांनी मागणी केलेल्या सभेसाठी तीन दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. तहकूब सभेतील विषय अन्य सभेत घ्यावेत अथवा घेऊ नये याबाबत महापालिका अधिनियमात कोणतीही तरतूद दिसून येत नाही. आजची सभा विशेष नसून नियमित मासिक सभा आहे. त्यामुळे सभा विहित कायदेशीर मार्गाने वैधरित्या आयोजित करण्यात आली आहे असा दावा राजेश आगळे यांनी केला.
त्यावर योगेश बहल म्हणाले, ‘स्थायी समितीच्या ठरावानुसार विशेष सभा घेतली जाते. ही नियमित सभा आहे. या सभेला सात दिवसांची पूर्ण नोटीस देणे बंधनकारक असताना ती दिली नाही. तहकूब सभेतील विषय नियमित सभेत घेता येतात की नाही, याची स्पष्टता नसतानाही विषय घेतले जातात. चुकीच्या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा दिला जाणार नाही’ असे म्हणत प्रशासनाचा निषेध करुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यानंतर सभा कायदेशीर असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपने सभेचे कामकाज पूर्ण केले.
