पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवात दरवर्षी विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील दहीहंडीचा उत्सव जोशात साजरा होणार असल्यामुळे पोलिसांची या उत्सवाकडे करडी नजर ठेवली जाणार आहे.
दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार घडताना दिसतात. अशा प्रकारांमुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील डान्स किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतही नियम व निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.
यावेळी गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शांततेत आणि संयमाने विसर्जन मिरवणूक पार पाडणाऱ्या गणेश मंडळांचा यावेळी पोलिसांकडून ‘श्री मोरया गणपती पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रसार माध्यमांशी बोलताना आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ” दहीहंडी आयोजकांनी नियमांचे पालन करावे. उत्सवाच्या नावाखाली अश्लीलता किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यक्रमाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांकडून त्याची दखल घेऊन संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
