ब्रेकिंग न्यूज

गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटून तरुण जखमी; एकाला अटक तर गुन्हेगार फरार

Share

पुणे – गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक चाप दाबला गेल्याने गोळी सुटून तरुणाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याच्या साथीदाराने जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साथीदाराला अटक केली आहे. मात्र पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार मात्र तेथून पळून गेला.

अविनाश दादासो मोरे (वय १९, रा. दत्तनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सनी ऊर्फ संदीप सुभाष दीपक (वय ३०, रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौक येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हा) याच्यासह सनी दीपक व अविनाश मोरे यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौकात संकेत चोरघे, सनी दीपक आणि अविनाश मोरे हे मध्यरात्री जमले होते. यावेळी संकेत चोरघे याने त्याच्याकडील पिस्तूल दाखविले. अविनाश मोरे याने हे पिस्तूल घेऊन पाहिले. त्यानंतर सनी याने हे पिस्तूल घेऊन पहात असताना अचानक चाप ओढला. त्याबरोबर त्यातून गोळी सुटून ती त्याच्या मांडीत शिरली. हे पाहून संकेत चोरघे हा पळून गेला. अविनाश मोरे याने जखमी सनी याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधून भारती विद्यापीठ पोलिसांना गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी सनी दीपक याच्याकडे चौकशी केली. त्यातून गोळीबाराचा हा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.