पुणे- एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून चक्क सात पिस्तुले चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बंडगार्डन पोलिसांच्यामुद्देमाल कक्षामध्ये घडला. पिस्तुले चोरणाऱ्या व्यक्तीने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. संबंधित व्यक्तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी धावाधाव करून पिस्तुले चोरणाऱ्या इसमास ताब्यात घेतले.
या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार चिटेकर (मूळ रा. कलबुर्गी, कर्नाटक) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीतील मुद्देमाल कक्षाचा मागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सुरुवातीला त्याने तेथून काही बिअरच्या बाटल्या चोरल्या. त्यानंतर मुद्देमाल कक्षात ठेवलेली सात पिस्तुले घेऊन तो दिवसभर शहरात फिरत राहिला.
रात्री साडेदहाच्या सुमारास वासवानी चौकातून बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर आल्यानंतर त्याने एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी चिटेकरला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पिस्तुले चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडील पिशवीत उर्वरित सहा पिस्तुले असल्याचेही समोर आले. मात्र, ही पिशवी त्याच्याकडून दुसऱ्या एका इसमाने नेली होती.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने पिशवीचा शोध घेतला. त्यानंतर जनरल पोस्ट ऑफिस परिसरातील झाडीत ही पिशवी आढळून आली. त्यातील सहाही पिस्तुले पोलिसांनी हस्तगत केली. ही सातही पिस्तुले २०२२ मधील कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
