पिंपरी- शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगेतून शुभ्रधवल पाण्याच्या धारा खळाळत होत्या आणि पायथ्याच्या अथांग जलाशयात विसावत होत्या. निसर्गसंपन्न आसमंतात श्रावणसरी बरसत होत्या आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिवे गावातील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात सुरेल शब्दांच्या सरी बरसत होत्या! कविता, भावना, विचार आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवत ‘श्रावणधारा कविसंमेलन’ मोठ्या उत्साहात रंगले होते.
खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न शिवे येथील ज्ञानदीप विद्यालयात शुक्रवारी दि. २१ ही कवितेची मैफल रंगली होती. मोशी येथील इंद्रायणी साहित्य परिषद आणि स्व. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालय, शिवे यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘श्रावणधारा कविसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला चालना देणे, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे आणि कवितेच्या माध्यमातून त्यांच्यातील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणे, अशा सुंदर हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्रीच्या डोंगररांगात वाड्यावस्त्यांत, गावखेड्यांत राहणारे हे विद्यार्थी म्हणजे एका अर्थी स्वच्छंदी रानपाखरंच! त्यांच्यातील साहित्यिक ऊर्मीला, सृजनशीलतेला वाट मोकळी करून देण्यासाठी काही नामवंत कवी, कवयित्रींना घेऊन इंद्रायणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी या गावी गेले होते. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या शब्दांनी काव्यमैफलीची सुरुवात झाली आणि त्यांच्या प्रतिभेने रसिकांची मने प्रफुल्लित झाली. कोवळ्या वयातील निरागस भावना, श्रावणाचे अप्रतिम सौंदर्य, निसर्ग, पाऊस, मैत्री, सामाजिक जाणिवा आणि जीवनातील विविध अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांमधून शब्दबद्ध केले.
मंचावर कविता सादर करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या शब्दांमधील उत्स्फूर्तता उपस्थितांच्या मनाला भावून गेली. प्रत्येक सादरीकरणाला मिळणाऱ्या टाळ्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढत गेला. विद्यार्थ्यांच्या या शब्दफुलांनी कविसंमेलनाची पहिली रंगत खुलली आणि त्यानंतर प्रथितयश कवी – कवयित्रींच्या कवितांनी या मैफलीला अधिकच उंची प्राप्त करून दिली. प्रत्येक कवीच्या कवितेचे भावविश्व वेगळे होते. कुठे निसर्गाची हळवी साद होती, कुठे माणसाच्या मनातील भावनांचे तरंग होते, तर कुठे समाजवास्तवाचे भान होते. शब्दांच्या या विविध रंगछटांनी सभागृहात कधी हास्य फुलले, कधी अंतर्मुख करणारी शांतता पसरली, तर कधी टाळ्यांचा कडकडाट झाला.
श्रावणाच्या सरींसोबत शब्दांच्या सरीही रसिकांच्या मनावर बरसत राहिल्या. इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा आणि साहित्याची गोडी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी परिषद प्रथितयश लेखक कवींना घेऊन खेड्यात आली आहे, असे स्पष्ट केले. परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, उपाध्यक्षा डॉ. पौर्णिमा कोल्हे, सचिव राम सासवडे, शिवे येथील वाचनालयाचे प्रमुख रोहिदास गडदे, नामवंत कवी चंद्रकांत धस, प्रा. महादेव रोकडे, शिवाजी चव्हाण, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, प्रा. जयश्री थोरवे, रेखा दुसाने, सीमा जाधव इत्यादी मंचावर उपस्थित होते.
यावेळी वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने परिषदेच्या वतीने शाळेला आणि वाचनालयाला काही पुस्तके भेट देण्यात आली. प्रा. महादेव रोकडे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व विषद केले. रोहिदास गडदे यांनी या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्याध्यापक शंकर साळुंखे यांनी स्वागत केले. तेजस्विनी देशमुख यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. माणिक सस्ते, अलंकार हिंगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कविसंमेलनानंतर सर्वांनी शिवे येथील गडदे स्मृती वाचनालयाला भेट दिली. लहानशा आणि दुर्गम गावातील समृद्ध वाचनालय पाहून सर्वांनी कौतुक केले.
