बारामती- येथील २३ वर्षीय तरुणीचा संशयस्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीने मृत्यूपूर्वी आईला फोन करून सांगितले होते की ” अथर्व मला गोळी देणार आहे, त्याला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत” त्यामुळे तिला कोणती गोळी देण्यात आली? तिच्या मृत्युचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस करत आहेत. मृत्युपूर्वी काही तास तरुणीचा आईला फोन आल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
बारामती शहर पोलिसांनी पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
मृत तरुणी ऑक्टोबर 2025 पासून पुण्यात एमपीएससीचे क्लास करत होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचे अथर्व याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचे लग्न ठरले होते. ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता अथर्व कार घेऊन तिला बारामतीतील टी.सी. कॉलेजमध्ये एमबीए प्रवेशासाठी घेऊन गेला. संध्याकाळी ४ वाजता तिने आईला मेसेज करून माहिती दिली. त्यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता ती अथर्वसोबत कारमध्ये दिसली.
संध्याकाळी ७ वाजता आईने फोन केला असता “अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जातोय. त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला गोळी खायला देणार आहे.” हे ऐकून आईने तिला लगेच घरी येण्यास सांगितले.
रात्री ९ वाजता “जेवण करते” असा तिचा मेसेज आला आणि नंतर संपर्क तुटल्याचे आईने म्हटले आहे. त्यानंतर रात्री 10 वाजता अथर्वने मुलीला चक्कर आली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचे मुलीच्या आईला फोन करून सांगितले. त्याने तिला प्रथम देवकाते, नंतर भोंईटे आणि शेवटी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये नेले. आई साडेदहा च्या दरम्यान पोहोचली असता मुलीचा मृत्यू झाला होता. अथर्वने सांगितले की तो तिला घरी घेऊन गेला होता आणि तिथे शारीरिक संबंधानंतर तिला चक्कर आली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिला कोणती गोळी देण्यात आली होती? याचा उलगडा पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच होईल. पोलीस पुढील तपास करत आहेत.
