ब्रेकिंग न्यूज

विद्यार्थ्यांनो..पुणे महापालिका तुम्हाला देणार २५ हजार रुपयांची स्कॉलरशीप, त्यासाठी असा अर्ज करा 

Share

पुणे महापालिका हद्दीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजना आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, तर बारावीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

महापालिकेकडून दरवर्षी हे शैक्षणिक अर्थसाह्य दिले जात असून, शहरातील सुमारे १२ ते १५ हजार मुलांना त्याचा लाभ मिळतो. या शिष्यवृत्तीसाठी महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी दहावी किंवा बारावीमध्ये किमान ८० टक्के गुण आवश्यक आहेत. तर राज्य शासन किंवा महापालिका अनुदानित शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान ७० टक्के गुणांची अट आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किमान ४५ टक्के गुण, तर कचरावेचक, बांधकाम कामगार आणि असंघटित कामगारांच्या मुलांसाठी किमान ६५ टक्के गुण आवश्यक आहेत.

अर्ज पालकांच्या नावाने ऑनलाइन भरावा लागणार आहे. मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे तसेच महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याचे आधारशी संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचे वेळापत्रक

अर्ज भरण्यास सुरुवात- १७ ऑगस्ट २०२६

अर्ज भरण्याची अंतिम मुदत- ३१ डिसेंबर २०२६

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

dbt.pmc.gov.in