पुणे – बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यासह तिच्या साथीदारांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याचा आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘न्याती हाईलँड्स’ परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
‘करुणादीप फाउंडेशन’चे ते सदस्य आहेत. या संस्थेने सप्टेंबरमध्ये बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला कोणतेही अधिकृत आमंत्रण किंवा प्रसिद्धीचे काम देण्यात आले नव्हते. तरीही या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळवून दिल्याचा दावा करत दिव्या शिंदे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. डॉ. गायकवाड यांनी सुमारे ५० हजार रुपये गुगल पेने दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
एफआयआरनुसार, दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे आणि काही जणांनी डॉ. गायकवाड यांच्या घरी जाऊन पैसे मागितले. त्यानंतर गुरुवारी रात्री घरात घुसून काठी, बेल्ट आणि तांब्याने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. घरातील वस्तूंची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जखमी डॉ. गायकवाड यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिव्या शिंदेच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून प्रकरण खोटे असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
