ब्रेकिंग न्यूज

पुण्यात डॉक्टरकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेचा डॉक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

Businessman giving money in the envelope to his partner in the dark - bribery and venality concept
Share

पुणे – धानोरी येथील एका खासगी हॉस्पिटलच्या कामातील अनियमिततेवर कारवाई न करण्यासाठी तसेच नोंदणी रद्द न करण्याकरिता पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)शनिवारी (ता.२६) रंगेहाथ पकडले.

डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०,रा. शुभ गेटवे, विमाननगर, पुणे) असे या लाचखोर डॉक्टरांचे नाव आहे. पुणे महापालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रादेशिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२)म्हणून ते नेमणूकीस आहेत. या प्रकरणी ​धानोरी येथील एका ४६ वर्षीय डॉक्टरने एसीबी कडे तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या हॉस्पिटलमधील कामात अनियमितता असल्याबाबत पुणे महापालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्याच्या चौकशीची जबाबदारी डॉ.चकोर यांच्याकडे होती. त्यांनी तक्रारदाराच्या हॉस्पिटलला १८ सप्टेंबर रोजी भेट दिली. “त्रुटींचे निवारण करावे लागेल, नाहीतर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवून देईन,” अशी धमकी त्यांनी तक्रारदार डॉक्टरला दिली. ही कारवाई टाळायची असल्यास त्यांनी सुरुवातीला २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच त्यावेळी तक्रारदाराकडे असलेले १५ हजार रुपये त्यांनी स्वीकारले होते.​

त्यानंतर तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी एसीबी च्या पुणे परिक्षेत्र कार्यालयात तक्रार दिली. २४ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत डॉ.चकोर यांनी तक्रारदाराच्या हॉस्पिटलवर कमीत कमी कारवाई (फक्त नोटीस देणे) करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठांकरिता ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच यापूर्वी १५ हजार रुपये स्वीकारल्याचेही निष्पन्न झाले.

२६ सप्टेंबर रोजी शनिवारी धानोरी (भैरवनगर)येथील तक्रारदाराच्या हॉस्पिटलमध्ये एसीबी ने सापळा रचला. तेथे त्यांच्या केबिनमध्ये डॉ.चकोर यांनी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी च्या पथकाने त्यांना दुपारी १:४७ वाजता रंगेहाथ ताब्यात घेतले. नंतर त्यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला. ​

त्यांनी स्वतःसाठी तसेच आपल्या वरिष्ठांकरिता ही लाच घेतल्याने हा वरिष्ठ कोण याची चर्चा आता पुणे मनपा वर्तुळात सुरु झाली आहे.

ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ,हवालदार प्रवीण तावरे, वनिता गोरे, पोलीस कॉन्स्टेबल आश्विन कुमकर, चंद्रकांत कदम या पथकाने केली.