पुणे- पुण्यात गणपती विसर्जनाची धामधूम सुरु असतानाच याच गर्दीचा आणि धामधुमीचा फायदा घेऊन मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत मुठा नदीपात्रात उभ्या असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना डाव उधळला गेला. या टोळीकडून विविध नामांकित कंपन्यांचे ६३ महागडे मोबाईल फोन आणि एक चारचाकी असा तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अब्दुल कादिर नूर महंमद (वय २८), अब्दुल मालिक अब्दुल खालीक (वय २२), झीआउर रहमान अताउर रहमान शौकत हुसेन (वय २६), महंमद असवद महंमद अजमल (वय ३१), फैसल अजीज खान (वय २४), हुजेफा अंजुम महंमद साजिद अन्सारी (वय ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५), अझर अहमद अल्लाफ अहमद मोमीन (वय ३०), नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (वय ३३) अतहर अहमद एजाज अहमद (वय २३, सर्व रा. मालेगाव, नाशिक) आणि अतुल मारोती इंगळे (वय २४, रा. गिरोली, जि. वाशीम) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे बाहेरच्या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.
संपूर्ण पुणे शहर गणेश विसर्जनाचा आनंद घेत असतानाच दुसरीकडे एक सशस्त्र टोळी मुठा नदीच्या पात्रात बसून दरोड्याची तयारी करत असल्याची गुप्त खबर पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत पोलीस निरीक्षक अमर काळगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नदीपात्रात छापा टाकून संशयितांना चहूबाजूने घेरले आणि ताब्यात घेतले.
पकडलेल्या आरोपींची कसून झडती घेतली असता पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आरोपींकडे गर्दीतून लांबवलेले ६३ महागडे स्मार्टफोन आणि चारचाकी तर सापडलीच, पण त्यासोबतच धारदार सुऱ्या, कटर, दोरी आणि डोळ्यात फेकण्यासाठी आणलेली मिरचीपूड असे दरोड्याचे घातक साहित्यही हस्तगत करण्यात आले. या आंतरजिल्हा टोळीने आणखी किती भाविकांना गंडा घातला आहे, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
