ब्रेकिंग न्यूज

सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आणखी एका वैष्णवीने संपवले जीवन

Share

पुणे- वैष्णवी हगवणे, शिल्पा गवारे या विवाहितांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची चर्चा अजूनही सुरु आहे. त्यातच आता आणखी एका वैष्णवीने आपले जीवन संपवले आहे. कार घेण्यासाठी ५ लाख रुपये माहेरून घेऊन ये या मागणीला आणि त्यासाठी सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी जरांडे या आयटी इंजिनअर विवाहितेने लग्नानंतर चार महिन्यातच आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी प्रवीण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता.

काळेपडळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरच्यांनी ४५ लाख खर्च, १० तोळे सोने दिले होते. लग्नाच्या महिन्याभरानंतरच १० जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत किंवा गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी केली. लग्नानंतर वैष्णवी सासरी २३ दिवस सुट्टीवर होती. त्यानंतर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे गेली. जूनअखेरीस ती पुन्हा सासरी आली आणि घरातूनच आयटी कंपनीचे काम करू लागली. त्यानंतर तिला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता.

२४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन करून सासरी खूप त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ‘तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल’, असं म्हणत वैष्णवीच्या नवऱ्याचा फोन तिच्या माहेरच्यांना आला. त्यानंतर वैष्णवीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन लागला नाही. त्यामुळे तातडीने आई वडील पुण्याला निघाले.

वैष्णवीच्या सासरी पहाटे पोहोचले तेव्हा वैष्णवीचा मृतदेह गोधडीने झाकलेल्या अवस्थेत आढळला. तिने पंख्याला गळफास लावून घेतल्याचे सासरच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी काळेपडळ पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पण वैष्णवीने खरंच आत्महत्या केली की तिची हत्या झाली या प्रश्नाचे उत्तर तपासानंतर समोर येईल.