पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींवर ३ ऑगस्ट पासून सुनावणी सुरु होणार आहे. आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात ही सुनावणी होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने सुधारित प्रारूप विकास योजना आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. आराखड्यावर ५६ हजार ७७९ हरकती प्राप्त झाल्या. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने १५ मे २०२६ रोजी मान्यता दिली आहे.
हरकत नोंदवलेल्या नागरिकांना टपालाद्वारे नोटीस पाठवून सुनावणीच्या ठिकाण, वेळ व तारीख कळवण्यात आली आहे. सुनावणी प्रक्रियेसाठी तेथे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगररचना विभागाचे उपसंचालक, नगररचनाकार सहायक नगररचनाकार, कनिष्ठ आरेखक, वरिष्ठ लिपिक कंत्राटी लिपिक, कंत्राटी तांत्रिक व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
सुनावणी समितीमध्ये कोण असणार ?
सुनावणी समितीमध्ये नगररचना विभागाचे निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, निवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार, निवृत्त उपसंचालक उत्तरेश्वर लोंढे, पर्यावरण अभियंता नरसू शिंदे, या चार तज्ज्ञांचा, तसेच स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सदस्य संदीप कस्पटे, आणि सारिका गायकवाड या सात जणांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे.
