ब्रेकिंग न्यूज

बी जे महाविद्यालयातील विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता ; रॅगिंग होत असल्याचा पालकांचा संशय

Share

पुणे- बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील एक विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेज कॅम्पसमध्ये रॅंगिंग झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तन्मय अजकुमार वंगे (वय २०) असे बेपत्ता झालेला विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. १८ जुलै रोजी त्याने आपण खराडी येथे गावाकडील मित्राकडे जात असल्याचे हॉस्टेलवर सांगितले तिथून हडपसर येथील एका नातेवाइकांकडे जाणार असल्याचे सांगून तो तिथून बाहेर पडला. मात्र, तो नातेवाईकांकडे पोहोचलाच नाही. त्याचा मोबाइल देखील १८ जुलै पासून बंद असल्याचे समोर आले आहे. मुलाचा संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या पालकांनी २० जुलै रोजी पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी, म्हणजेच २७ जुलै रोजी पालकांनी बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली. कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅंगिंगमुळेच त्रस्त होऊन मुलाने वसतिगृह सोडले आणि तो बेपत्ता झाला, असा थेट आणि खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. पालकांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वारंवार अपमानास्पद वागणूक देणे, चिडवणे, टोमणे मारणे असे प्रकार करून मानसिक त्रास दिला जात आहे अशी माहिती तन्मय याने आपल्या मित्रांजवळ व्यक्त केल्याचे पालकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील सीसी टीव्ही फुटेज तपासून संबंधित विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.