ब्रेकिंग न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी रमेश मुखेकर निलंबित

Share

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट बी.कॉम. पदवी आणि गुणपत्रिका दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा न देता पदवी मिळवून देण्यासाठी वित्त व लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका रिक्षाचालकाने केला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणी विद्यापीठाने वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर याला तात्काळ निलंबित केले आहे.

देशात सध्या नीट पेपरफुटीवरुन संताप व्यक्त होत असतानाच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रिक्षाचालकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट डिग्री मिळवण्याचा प्रयत्न केला. बी.कॉम.ची पदवी मिळवून देण्यासाठी वित्त व लेखा विभागातील एका अधिकाऱ्याने साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका रिक्षाचालकाने केला आहे. महेश कदम असे या रिक्षाचालकाने नाव आहे.

विद्यापीठातील वित्त आणि सेवा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर याच्याशी महेश कदम यांनी डिग्री प्रमाणपत्रासाठी संपर्क साधला होता. रमेश मुखेकरने तीन लाख रुपयांच्या बदल्यात आपल्या मुलाला बी. कॉमचे बनावट पदवी प्रमाणपत्र देण्याचं कबूल केले होते. मात्र, दीड लाख रुपयांवरच हा व्यवहार ठरला होता असा दावा महेश कदम यांनी केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी रमेश मुखेकर याला निलंबित करून तात्काळ सत्यशोधन समिती नियुक्त केली आहे. चौकशी अहवालानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे.

राज्यात आधीच पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अपहार, लाचखोरी, भ्रष्टाचार यावरुन रणकंदन माजलं असताना आता बोगस पदवी प्रमाणपत्र तेही विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समोर आल्याने शिक्षणक्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे.