नात्यातील अल्पवयीन मुलीचा पोलिसाकडूनच विनयभंग ; टिटवाळ्यातील धक्कादायक प्रकार

टिटवाळा- टिटवाळा येथे ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षणकर्त्या पोलिसांनी अत्यंत हीन कृत्य केल्याचे उघड झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलीस कर्मचारी अद्याप फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
गणेश परदेशी असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो सध्या ठाणे पोलीस मुख्यालय येथे आपल्या पदावर कार्यरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित ९ वर्षीय बालिका ही या आरोपीची जवळची नातेवाईकच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी २०२६ मध्ये घडला होता. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. टिटवाळा पोलिसांनी आरोपी गणेश परदेशी याच्या विरोधात विनयभंग आणि लहान मुलांवरील अत्याचाराशी संबंधित कलमांन्वये रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, स्वतःवर गुन्हा दाखल होताच गणेश परदेशी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.






