जीवघेणा वार चुकला अन्यथा….; पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकीस्वारावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात एक थरारक घटना घडली आहे. चिखली येथील साने चौक परिसरात एका गावगुंडाने दुचाकीवरून निघालेल्या इसमावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा वार थोडक्यात चुकला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री साने चौक परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती. काहीजण दुकानं बंद करत होते. त्याचवेळी दुचाकीवरून निघालेल्या इसमावर एका गावगुंडाने कोयत्याने वार केले. सुदैवाने या भीषण हल्ल्यात दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्यामुळे गुंडाचा जीवघेणा वार चुकवला गेला.
मात्र, या थरारक घटनेचा व्हिडीओ परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात एक तरुण हातात धारदार हत्यार घेऊन दुचाकीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. त्वेषाने पाठलाग करताना हा तरुण दुचाकीस्वारावर हल्लाही करतो. मात्र काही इंचाने हा हल्ला चुकतो. या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराने अद्याप चिखली पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून चिखली पोलिसांनी कसून शोध सुरू केला असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.






