सायबर गुन्हेगारांचा थेट ठाणे पोलीस आयुक्तांच्या मोबाइलवरच हल्ला, व्हाट्सअप स्टेटसला शेअर केले २० अश्लील व्हिडीओ

सायबर गुन्हेगारांचा थेट ठाणे पोलीस आयुक्तांच्या मोबाइलवरच हल्ला, व्हाट्सअप स्टेटसला शेअर केले २० अश्लील व्हिडीओ
Share

ठाणे- मोबाइलवर एखादी लिंक पाठवून, ओटीपी पाठवून किंवा डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावरील लाखो रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. या गुन्हेगारांनी थेट ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याच मोबाइलवर हल्ला करून त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तब्बल २० अश्लील व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलीस आयुक्तांच्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. सुरुवातीला हे स्टेटस डिलीटही करता येत नव्हते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या हिकमतीने अखेर ६ वाजता हे स्टेटस डिलीट करण्यात यश मिळवले.

दुपारी ४ वाजून ४६ मिनिटांनी हा प्रकार उघडकीस आला. आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अश्लील व्हिडीओ दिसत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शंका आली. हॅक करणाऱ्याने टप्प्याटप्प्याने काही मिनिटात २० अश्लील व्हिडीओ स्टेटसला टाकले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शंकेची पाल चुकचुकल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतर्क झाले होते. सुरुवातीला हे स्टेटस डिलीट होत नसल्याने चिंता निर्माण झाली होती. पण अखेर सव्वा तासाने ते डिलीट झाले.

अखेर पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करणारे हे सायबर भामटे कोण? आणि या हॅकिंगमागे नेमकं काय कारण आहे? सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग माने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे

Vedh News