पतीने कॅप्सूलमधून पत्नीला ब्लेडचे तुकडे खायला दिले ; पतीला वाचवण्यासाठी पत्नीने कोर्टात साक्ष फिरवली पण…..

पतीने कॅप्सूलमधून पत्नीला ब्लेडचे तुकडे खायला दिले ; पतीला वाचवण्यासाठी पत्नीने कोर्टात साक्ष फिरवली पण…..
Share

पुणे- पत्नीला ‘कॅल्शियमची गोळी’ देण्याच्या बहाण्याने कॅप्सूलमधून ब्लेडचे बारीक तुकडे खायला घालून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खटला कोर्टात उभा राहिला. मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान पत्नी आणि मुलाने आपली साक्ष फिरवून पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण उपलब्ध पुराव्यांमुळे पतीला तुरुंगात खडी फोडायला जावेच लागले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी पतीला दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. शिवणे, पुणे) असे शिक्षा झालेल्या दोषी पतीचे नाव आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याच्याविरोधात पत्नीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या आधारे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याबाबतची माहिती अशी की पत्नीला पोटदुखीचा तीव्र त्रास होत होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये पत्नीच्या पोटात असह्य वेदना होऊन शौचावाटे ब्लेडचा तुकडा बाहेर पडला. त्यांनी ही बाब आरोपी पतीला सांगितल्यावर त्याने शांतपणे ब्लेडचा तुकडा कचऱ्यात फेकून दिला. त्यानंतर चार नोव्हेंबर २०२३ रोजी पुन्हा शौचावाटे ब्लेडचा तुकडा बाहेर पडल्यानंतर पत्नीला रुग्णालयात दाखल केले. ‘सीटी स्कॅन’मध्ये पत्नीच्या आतड्यात ब्लेडचा तुकडा अडकल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी ‘एंडोस्कोपी’ करून ब्लेडचा तुकडा बाहेर काढला.

केश कर्तनाचे काम करणारा पती सोमनाथ सपकाळ आपल्या पतीवर चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी त्रास देत होता. मात्र, घटनेच्या आधी दोन महिने तो अचानक प्रेमाने वागू लागला. पत्नीचा पाय दुखत असल्याने त्याने पत्नीला कॅल्शियमची कॅप्सूल देण्यास सुरुवात केली. मात्र कॅप्सूल देण्यापूर्वी त्यामधील औषध काढून त्यामध्ये ब्लेडचे लहानलहान तुकडे भरून ती कॅप्सूल पत्नीला खायला देत असे. पुढे पत्नीला शौचावाटे वारंवार ब्लेडचा तुकडा पडल्यामुळे तिला संशय येऊन तिने पतीच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी कसून केलेल्या तपासात पुराव्यांसहित सर्व प्रकार समोर आला.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र खटल्याची सुनावणी सुरु असताना तक्रारदार पत्नी आणि त्यांच्या मुलाने न्यायालयात साक्ष फिरविली आणि हॉटेलमध्ये खाल्ल्यामुळे पोट दुखत असल्याची साक्ष दिली. मात्र, डॉक्टरांनी सादर केलेल्या वैद्यकीय पुराव्यातून अन्नासमवेत ब्लेड गिळल्यास अन्ननलिका आणि आतड्यांना अंतर्गत जखमा झाल्या, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपी पतीने औषधी गोळ्यांचे पाकीट नेल्याची साक्ष औषध विक्रेत्याने नोंदविली. पोलिसांनी आरोपीच्या घराच्या दिवाणातून उर्वरित ब्लेडचे तुकडे आणि औषधी गोळ्यांचे पाकीट जप्त केले होते.

‘केवळ साक्षीदार किंवा पीडितेने साक्ष फिरवली म्हणून संपूर्ण खटला बाद होत नाही. वैद्यकीय आणि परिस्थितिजन्य पुरावे गुन्ह्याची साखळी जोडत असतील, तर फितूर साक्षीदाराच्या जबाबातील विश्वासार्ह भाग स्वीकारून आरोपीला दोषी ठरवता येते,’ या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निवाड्यांचा आधार घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला. ‘साक्षीदाराने एखादी गोष्ट खोटी सांगितली म्हणजे त्याच्या सर्वच गोष्टी खोट्या असल्याचे भारतीय न्यायशास्त्र मानत नाही. त्याने साक्ष व उलटतपासणीत सांगितलेल्या बाबींना इतर पुराव्यांचा दुजोरा मिळाल्यास आरोपीला शिक्षा होऊ शकते,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्यात सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर आणि एल. आर. पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले.

Vedh News