सीस-पे घोटाळ्यात फरार तलाठी दशरथ रोडेला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

सीस-पे घोटाळ्यात फरार तलाठी दशरथ रोडेला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
Share

पुणे- लाखांच्या गुंतवणुकीवर ८ ते १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तळेगाव ढमढेरे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१, रा. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा येथून अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने रोडे याला २७ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकात पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते आणि फुरकान शेख यांचा समावेश होता. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) संशयितांचा शोध सुरू असताना दशरथ रोडे हा श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून रोडे याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

दशरथ रोडे हा शासकीय सेवेत तलाठी म्हणून कार्यरत असतानाच सिस्पे कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने अनेक नागरिकांना या कंपनीत पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले असावे, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. तसेच रोडे याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तीही कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

काय आहे प्रकरण ?

सिस-पे, इन्फिनिटी, बिकन आणि ग्लोबल ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार सुरु होता. गुंतवणूकदारांना अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे आणि दरमहा ५ ते ७ टक्के इतका प्रचंड परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सुरुवातीला काही महिने नियमित परतावा दिला गेला. तसेच, पंचतारांकित हॉटेल्समध्ये भव्य सेमिनार आयोजित करून कंपनी खूप मोठी असल्याचा बडेजाव करण्यात आला. अल्पावधीतच हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले.

कर्जत तालुक्यातील मांदळी येथील रहिवासी नितीन गांगर्डे यांनी तक्रार दिल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची व्याप्ती पाहून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले. या प्रकरणी कंपनीचे चालक, एजंट आणि इतर साथीदारांसह ९८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल काळोखे हा परदेशात पळून गेला होता, ज्याला इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीशीनंतर फिजीमधून ताब्यात घेऊन ३० जुलै रोजी भारतात आणण्यात आले. शासनाने या घोटाळ्यातील आरोपी व एजंट यांच्या ११५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली असून आणखी ६० कोटींच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव पाठवला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक मुख्य आरोपी आणि एजंट्सना गजाआड करण्यात आले आहे. तसेच कंपनी आणि एजंटांशी संबंधित सुमारे २,००० बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

Vedh News