पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळणार सानुग्रह अनुदान !

पिंपरी- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मागणीबाबत महापौरांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कामगार नेते यशवंत भोसले यांनी कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा, तसेच कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
महापौर रवी लांडगे म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या बोनसचा विषय कामगार नेते यशवंत भोसले यांच्या माध्यमातून आमच्यासमोर आला होता. यशवंत भोसले हे अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत असून, कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लागला आहे. काही कामगारांच्या मासिक वेतनामध्ये वाढ करून त्यातून बोनसच्या स्वरूपात वर्षाला जवळपास १८ ते १९ हजार रुपये मिळाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर विभागांमध्ये मिळून जवळपास दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कामगार मनापासून मेहनत घेतात. त्यांच्या कष्टांमुळेच महापालिकेला शहरातील नागरिकांना विविध सेवा व्यवस्थितपणे देता येतात. त्यांच्या योगदानाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.
या कामगारांना दिवाळीनिमित्त जास्तीत जास्त किती सानुग्रह अनुदान देता येईल, याचे आर्थिक गणित मांडण्यास मुख्य लेखापरीक्षकांना सांगण्यात आले आहे. संपूर्ण हिशेब समोर आल्यानंतरच अनुदानाच्या रकमेबाबत निश्चितपणे सांगता येईल. मात्र, कंत्राटी कामगारांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी महापालिका निश्चितच सकारात्मक प्रयत्न करेल, असे आश्वासन महापौर रवी लांडगे यांनी दिले.
यशवंत भोसले म्हणाले की, महापौर रवी लांडगे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच संवेदनशीलता दाखवली आहे. कंत्राटी कामगार हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अनेकदा अधिक कष्टाचे काम करतात. शहर स्वच्छ ठेवण्यापासून आरोग्य, सुरक्षा आणि विविध अत्यावश्यक सेवांपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हे कामगार पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा विचार करून त्यांना दिवाळीच्या निमित्ताने किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
महापौरांनी संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आर्थिक गणित स्पष्ट झाल्यानंतर कंत्राटी कामगारांना किती सानुग्रह अनुदान मिळणार, याकडे संपूर्ण शहरातील कामगारांचे लक्ष लागले आहे.






