पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप ; माजी उपमहापौरांना पालिकेत प्रवेश बंदी 

पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप ; माजी उपमहापौरांना पालिकेत प्रवेश बंदी 
Share

पुणे – पुणे महापालिकेत नगरसचिव विभागात काम करणाऱ्या महिलेसोबत माजी उपमहापौरांनी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, प्रशासनाने माजी उपमहापौरांना महापालिकेच्या आवारात प्रवेशबंदी केली आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की गुरुवारी (ता. ५) दुपारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक होती. त्यामुळे नगरसचिव विभागातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी हे बैठकीच्या ठिकाणी होते. तसेच दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने उर्वरित कर्मचारी हे बाहेर होते. त्यावेळी नगरसचिव विभागात तक्रारदार महिला काम करत असताना उपमहापौर पद भूषविलेल्या माजी नगरसेवकाने थेट महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून गैरवर्तन केले, तसेच असभ्य भाषेत तिच्याशी संवाद साधला.’ असा आरोप आहे.

या महिलेने माजी उपमहापौरांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घडलेला प्रसंग वरिष्ठांच्या कानावर घातला. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. विशाखा समितीच्या अध्यक्षा, विधी सल्लागार ॲड. नीशा चव्हाण म्हणाल्या, ‘‘संबंधित महिलेची तक्रार प्राप्त झाली असून, यावर योग्य ती कारवाई केली जाईल’’

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तक्रारदार महिलेवर कोणताही दबाव येऊ नये आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीला पुढील आदेशापर्यंत महापालिकेच्या आवारात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे’ अशी माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.

 

 

Vedh News