दिवाळीसाठी गावी गेली अन्…पुण्यात राहणाऱ्या उच्चशिक्षित विवाहितेची प्रियकराने केली हत्या

पुणे – पुण्यात राहणारी एका विवाहित महिला तिच्या गावी गेलेली असताना तिच्याच प्रियकराने तिच्या आईदेखतच धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना सांगलीतील जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर रविवारी (दि. १५) घडली.
राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी मनोज हिम्मतराव कोळेकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेची माहिती अशी की, राजाक्का या पुणे येथील एका खासगी शिक्षण संस्थेत काम करण्याबरोबरच खासगी क्लासेसही घेत असत. राजाक्का यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच नात्यातील काशीराम खरात यांच्यासोबत झाला होता. परंतु राजाक्का यांचे कंठी परिसरातीलच एका तरुणासोबत गेल्या पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून राजाक्का यांनी हे प्रेमसंबंध कमी करून तरुणाला टाळण्यास सुरुवात केली होती.
राजाक्का या दहा दिवसांपूर्वी आपल्या गावी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आल्या होत्या. सांगलीतील जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर राहात होत्या. रविवारी सायंकाळी संशयित मनोज कोळेकर याने राजाक्का यांना भेटण्यासाठी आणि पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी फोनवरून सतत तगादा लावला. मात्र, राजाक्का यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या संशयित मनोजने रविवारी दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास आपल्या एका साथीदारासह थेट खरात वस्तीवरील त्यांच्या घरी धाव घेतली. त्याने राजाक्का यांच्या पोटावर आणि शरीराच्या अन्य भागांवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात राजाक्का या गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्या. ही संपूर्ण घटना राजाक्काच्या आईच्या समोरच घडली.
घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगाने तपास करून मुख्य संशयित मनोज कोळेकर आणि त्याच्या एका साथीदाराला अवघ्या काही तासांत अटक केली. जत पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने सांगली जिल्हा हादरून गेला आहे.
दिवाळीसाठी गावी गेली अन्…पुण्यात राहणाऱ्या उच्चशिक्षित विवाहितेची प्रियकराने केली हत्या






