पुण्यातील एअर हॉस्टेसचा मृतदेह आढळला गोंदिया जिल्ह्यातील जंगलात.. मित्रावर पोलिसांचा संशय

पुण्यातील एअर हॉस्टेसचा मृतदेह आढळला गोंदिया जिल्ह्यातील जंगलात.. मित्रावर पोलिसांचा संशय
Share

पुणे- खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या बोंडरानी जंगल परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित मृत महिला ही दिवाळीच्या सुट्टीत आपल्या माहेरी गेल्या होत्या.

वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. वर्षा तुरकर या मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही (नवेगाव किन्ही) गावच्या राहणाऱ्या होत्या. त्यांनी २०२४ मध्ये समर सैयद यांच्याशी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना अडीच ते तीन वर्षांची एक मुलगी आहे.

सध्या पुण्यात वास्तव्यास असलेलय वर्षा तुरकर यांचा मृतदेह दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडरानी जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी संशयास्पद स्थितीत आढळला. तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने चार वार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या वर्षा यांना खैरलांजी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने केली असावी, असे मानले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (दि. १४) दुपारी ४ च्या सुमारास त्या नितीश अग्रवाल या ओळखीच्या युवकासोबत बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते दोघे वैनगंगा नदीच्या काठाजवळ होते. याच ठिकाणी हल्लेखोराने वर्षा यांच्या पाठीत चार वार केले. हल्ला इतका गंभीर होता की घटनास्थळीच त्या कोसळल्या. घटनेनंतर लगेच नितीश अग्रवाल याने वर्षा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि मेहुणे अश्विनी पटेल यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच कुटुंबीय तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी वर्षा यांना उपचारासाठी खैरलांजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत नितीशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही दोघे घटनास्थळाच्या परिसरात गाडीतून उतरून बोलत असताना तीन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी लूटमार करण्याचा प्रयत्न केला. त्या तिघांपैकी एकाने वर्षावर चाकूने हल्ला केला.” मात्र या हल्ल्यात नितीश सुखरूप असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, दौनीवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Vedh News